हिप्पोक्रेट्सच्या नावानं चांगभलं । डॉ. पी. टी. गायकवाड
पाने : २५६ । किंमत : ३५० /- । पेपरबॅक
वैद्यकीय व्यवसाय हा खरेतर सेवाभावी व्यवसाय आहे. कोणताही रुग्ण अत्यंत विश्वासाने आपले जगणे डॉक्टरांच्या हवाली सोपवून यातनांमधून वाट शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र रुग्णांच्या असाहाय्यतेचा, अज्ञानाचा आणि नातेवाईकांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन आर्थिक लुटालुटीच्या एका भ्रष्ट व्यवस्थेने हा व्यवसाय आज गिळंकृत केला आहे. परिणामी या व्यवसायाची प्रतिष्ठा कमालीची धोक्यात आली असल्याच्या भीषण वास्तवाकडे डॉ.पी.टी. गायकवाड यांची ‘हिप्पोक्रेट्सच्या नावानं चांगभलं’ ही कादंबरी लक्ष वेधते. वैद्यकीय व्यवसाय हा उदात्त आणि आदर्श मानला जातो; मात्र अपवाद वगळता तितका तो आज आदर्श राहिलेला नाही. या व्यवसायाच्या आचारसंहितेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या हिप्पोक्रेट्सच्या शपथेला असलेले नैतिक मूल्य उरलेले नाही. व्यावसायिक नीतिमत्तेच्या -हासाचे दर्शन हे या कादंबरीचे मुख्य सूत्र आहे. मराठी कादंबरीला सर्वार्थाने अपरिचित असलेले जग डॉ. गायकवाड यांनी या कादंबरीत उभे केले आहे. कल्पित वास्तवाच्या सरमिसळीची एक एक वीट त्यांनी मोठ्या शिताफीने रचली आहे. एकामागोमाग एक घडणाऱ्या कादंबरीतल्या घटनांची गती मात्र विलक्षण आहे. आर्थिक मोहापायी कशाचेही तारतम्य न ठेवता रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या अनिष्ट वृत्तीप्रवृत्ती आणि त्यामुळे सडलेली भ्रष्ट व्यवस्था हा या कादंबरीचा मूळ गाभा आहे. म्हटलं तर, ही कहाणी एका प्रवाहपतित डॉक्टरची आहे आणि म्हटलं तर, ती आपल्याच आजूबाजूला सुरू असलेल्या मूल्यांच्या अध:पतनाची कहाणी आहे. जी वाचकाला अस्वस्थ करते, अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडते.
Reviews
There are no reviews yet.