पन्नास टक्क्यांची ठसठस । उत्तम कांबळे
पाने :
१२८ । किंमत : २००/- । मुखपृष्ठ : मिलिंद कडणे
स्थानिक
स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के राखीव जागा म्हणजे भारतीय महिलांच्या
राजकीय प्रवासातील जणू एक छोटी क्रांतीच होती. इथल्या पुरुषप्रधान व्यवस्थेनं मात्र
या क्रांतीला एकीकडे मोकळी जागा देत दुसरीकडे आपल्या संस्कृतीच्या जोरावर प्रतिक्रांतीच
केली आहे. महिला खुर्चीत आहेत पण सूत्रे मात्र व्यवस्थेने आपल्याच हातात ठेवली आहेत.
महिला अधिकारावर आहे पण अधिकार मात्र तिच्या भोवतालच्या दृश्यअदृश्य व्यवस्थांच्या
सावल्याच वापरत आहेत. या सावल्या मोठ्या वस्ताद आणि टोकदार आहेत. त्यांनी या निम्म्या
जगाला असा काही मुका मार दिला आहे, की त्यातून न दिसणारी एक अखंड ठसठस सुरू आहे. ती
दिसत नाही पण आत खोलखोल वास करत आहे. पन्नास टक्क्यांमध्ये घुसमट सोसणाऱ्या या जिवांची
ही हृदयद्रावक आणि लढाऊ चित्तरकथा.