युगानुयुगे
तूच : संदर्भ आणि अन्वयार्थ
संपादक
: एकनाथ पाटील । मुखपृष्ठ : मिलिंद कडणे
पाने :
१४४ । किंमत : २००/-
डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांच्या विचारातील रचनात्मक नवसर्जनशीलता अधोरेखित करणारी 'युगानुयुगे तूच' ही
कवी अजय कांडर यांची 'दीर्घविचारकविता' आहे. अन्यायाविरुद्धच्या संघर्षाबरोबरच मानवी
स्वातंत्र्य, स्त्रीमुक्ती आणि हिंसेवरील विजय या मूल्यांची सार्वकालिक प्रस्तुतता
अजय कांडर यांनी या कवितेत अभिव्यक्त केली आहे. जाणकारांचे लक्ष वेधून घेणारी ही कविता
चरित्राच्या अंगाने न जाता विचारसूत्रांचा शोध घेत पुढे जाते. जागतिकीकरणाच्या व नववसाहतवादाच्या
काळात निर्माण झालेल्या विचारसरणींच्या ऱ्हासाला एका जागृत विचारवंताच्या भूमिकेतून
कवी आव्हान देत आहे. विचारप्रवर्तक प्रस्तावनेसह या कवितेचा विविधांगी अन्वयार्थ उलगडून
सांगणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या लेखांचे संपादन एकनाथ पाटील यांनी प्रस्तुत पुस्तकात
केले आहे. कला, साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्राचे
मोठ्या प्रमाणात वस्तुकरण होत असताना, बुद्धांच्या व बाबासाहेबांच्या विचारांचा या
पुस्तकातील जागर समयोचित आहे. जगभरातील सर्व प्रकारच्या मागास समाजात बाबासाहेबांच्या
विचारांचे आकर्षण निर्माण झालेले असताना, त्यांच्या मुक्तिदायी राजकारणाचा या दीर्घकवितेच्या
निमित्ताने मराठीतील समीक्षकांनी घेतलेला हा वेध आश्वासक आहे.
- डॉ. अशोक
चौसाळकर