ग्लोबलचं
गावकूस । अरुण काळे
पाने :
१०२ । किंमत : १५०/-
अरुण काळे
यांची कविता जागतिकीकरणाच्या बाजारसंस्कृतीवर बोलते, माहितीक्रांतीचे अंतरंगही उलगडून
दाखवते आणि त्या क्रांतीच्या क्रमात ज्यांचे अगतिकीकरण झाले आहे त्यांच्या प्रश्नांनाही
वाचा फोडते; पण ती कुठेही वत्कृत्वपूर्ण किंवा निबंधवजा वाटत नाही. कारण तिचे कवितापण
तिला कधीच सोडून जात नाही. महत्त्वाच्या सामाजिक-राजकीय प्रश्नांसंबंधी सांगतानाही
वाचकाला काव्यात्म अनुभवाची अखंड प्रतीती देण्याची किमया आज हयात असलेल्या कवींपैकी
नामदेव ढसाळांच्या खालोखाल अरुण काळे यांनाच साध्य झाली आहे.
भोवतालच्या
बदललेल्या वास्तवाचे फक्त वर्णन करून कवी थांबत नाहीत तर आजच्या माणसासमोरच्या नैतिक-आध्यात्मिक
पेचांना ते शब्दांच्या चिमटीत अचूक पकडतात. त्यामुळे त्यांच्या या कवितेने दलित कवितेत
जसा तिचा स्वतंत्र प्रांत निर्माण केला आहे तसाच आज जागतिकीकरणावर मोठ्या प्रमाणात
लिहिल्या जाणाऱ्या मराठी कवितेच्या विश्वातही आपले स्वतःचे स्थान नक्कीच संपादित केलं
आहे.
- भास्कर
लक्ष्मण भोळे