आमची कविता
। मनोहर वाकोडे
पाने :
९६ । किंमत : १६०/-
सभोवतालचं
'जालीम जिणं पाहू न शकणाऱ्या' मनोहर वाकोडे या संवेदनशील कार्यकर्त्या-कवीनं 'अन्यायाचे
सूरे कलिजात भोसकलेल्यांची' ही कविता लिहिली तेव्हा सत्तरच्या दशकातल्या वास्तवाची
बेचैनी, अस्वस्थता त्या कवितेतल्या विदारक अनुभवांनी अधिक दाहक केली होती. पिचल्या-नागवल्या
गेलेल्या वर्गाच्या महाकाय दुःखाचं मूळ जाणल्यानंतर 'संघर्ष अटळ असतोच' असं मानणारा
आणि त्यासाठी आयुष्यभर उच्चतर मूल्यांनिशी लढत राहिलेला हा कवी आहे.
दुःख हे
सर्वव्यापी असलं तरी त्याच्या कारणांसाठी आणि निवारणासाठी जी लागते ती 'जिज्ञासा जेलमध्ये
नेते', असं जाणूनही हीच जिज्ञासा अन्यायाविरुद्ध क्रांतीचा उद्घोष करण्यासाठी इंधन
पुरवते याचा त्याला विश्वास आहे. कवीला विश्वास आहे की कधीतरी वंचितांनाही न्याय मिळेल.
'टॉवर झुकतील / पायदळी गाडलेल्या वंचितांच्या विद्रोहानं' ही त्यांची ओळ फ़ैज़ अहमद
फ़ैज़च्या 'सब ताज उछाले जाएंगे / सब तख़्त गिराए जाएंगे' या रोमांचक स्वप्नाची आठवण
करून देतात.
'लोकमंच'
आणि वाकोडेंच्या मित्रपरिवारानं राजेन्द्रन व्ही. यांच्या पुढाकारानं त्यांचा कवितासंग्रह
प्रकाशित केला होता. आजही त्यांच्या कवितांतील आशयाचा आणि भाषेचा ताजेपणा टिकून आहे.
म्हणूनही ती वाचकांसमोर येणं गरजेचं आहे. मनोहर वाकोडेंची कविता विषमता, अन्याय, जातीयता
आणि शोषणानं भविष्य भिरभिरं होऊन गेलेल्या पिढीचं आक्रंदन व्यक्त करते पण तिची भाषा
कडवट होत नाही. खास वऱ्हाडी भाषेतल्या लयीचं भान तिला असल्यानं ती अनुभवांचं प्रक्षेपण
अस्सलपणे करते आणि तमाम वंचितांसाठी-पिचलेल्यांसाठी 'या पूर्वेला कधी आमचाही सूर्य
उगवावा...' अशी प्रार्थनाही मांडते. या तिच्या प्रार्थनेतील साध्या, प्रामाणिक आणि
नितांत मानवी सुरामुळे ती मानवाच्या वैश्विक दुःखाशी आपलं नातं घट्टपणे बांधते.
- गणेश विसपुते