डहाण ।
अनिल साबळे
मुखपृष्ठ
: सरदार जाधव
गेटफोल्ड
। पाने :३६८ । किंमत : ४५०/-
दुर्गम,
आदिवासी भागातल्या एका आश्रमशाळेवर स्वयंपाकी म्हणून आलेला या कादंबरीचा नायक वाचकांसमोर
वेदनांची एक-एक तळघरं उघडत जातो. आश्रमशाळेतल्या शिक्षक कर्मचाऱ्यांचं शह- काटशहाचं
राजकारण, लेकरांच्या तोंडचा घास काळ्या बाजारात नेऊन पळवणारे डोमकावळे आणि ही
सारी विदारकता कमालीच्या थंडपणे पाहणारी यंत्रणा... अशा भ्रष्ट, निर्ढावलेल्या व्यवस्थेत
स्वतःतले सत्व कसोशीने सांभाळणारा संवेदनशील नायक या व्यवस्थेचीच तटस्थपणे चिकित्सा
करत जातो. भोवतालचा निसर्ग स्वतःच्या नजरेने न्याहाळतो.
आश्रमशाळेतल्या
निरागस मुलांच्या वाट्याला आलेले वंचनांचे जग अनिल साबळे यांनी या कादंबरीत साकारले
आहे. एखाद्या अनाम चित्रकाराने गुहेत रेखाटलेल्या चित्रासारखा गहिरेपणा इथे शब्दांना
आला आहे. लैंगिक शोषणाच्या विळख्यात अडकणाऱ्या मुली, आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलणारी
मुलं, निकृष्ट प्रतीचे अन्न, अस्वच्छता, असुरक्षितता असं सारं काही निमुटपणे सोसणारे
आणि आपलं शोषण होत आहे हेही धड न उमजणारे कोवळे जीव या कादंबरीत आपल्याला प्रत्येक
पानावर आढळतात. 'डहाण' म्हणजे व्रण, जखमेची खूण. ही कादंबरी वाचल्यानंतर आपल्या संवेदनेवरही
एक अमीट असा व्रण खोलवर उमटला आहे अशी अनुभूती वाचकाला नक्कीच येईल.
-आसाराम
लोमटे