उत्तरायन
। संदीप सारंग । लेखसंग्रह
पाने :
२८४ । किंमत : ३००/-
संदीप सारंग
हे पुरोगामी चळवळीतील महत्त्वाचे नाव. सम्यक समतेची संकल्पना उराशी बाळगून ते कार्यरत
आहेत. त्यांनी लेखक म्हणून वेळोवेळी घेतलेल्या भूमिका या जमिनीवर पाय रोवून घट्ट उभ्या
असलेल्या कार्यकर्त्याच्या भूमिका आहेत. विविध पुस्तकांमधून त्यांनी सामाजिक परिवर्तनाविषयी
आपली स्पष्ट मतं मांडलेली आहेत. 'उत्तरायण' या ग्रंथात त्यांनी एक विचारवंत कार्यकर्ता
म्हणून समकाळातील ज्वलंत प्रश्नांविषयी, गुंतागुंतींविषयी भाष्य केले आहे आणि स्वतःला
आकळलेले विचारव्यूह ठामपणे मांडले आहेत. मुक्तिदायी चळवळींसमोर असलेली सद्यकालीन आव्हाने,
कार्यकर्ते, लेखक, विचारवंत यांच्या भूमिका, धर्म, धर्मस्वातंत्र्य, जातिअंत, सांस्कृतिक
राजकारण, सामाजिक परिवर्तनाची स्थितीगती अशा विविध विषयांवर त्यांनी या पुस्तकातील
तीस लेखांमध्ये चर्चा केली आहे. या चर्चेत एक सलग सूत्र आहे. हे सूत्र संविधानात्मक
समतेचे जसे आहे तसे ते वैदिक-अवैदिक संघर्षाचे मूळ शोधणारे आणि हा संघर्ष आजच्या काळावर
कशा पद्धतीने प्रभाव टाकतो आहे याचा परामर्श घेणारे आहे. भारतीय परिवेशात जगणाऱ्या
माणसांना सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ होण्याच्या कोणत्या शक्यता उपलब्ध आहेत याचे चिंतन
आणि दिशादिग्दर्शन एक विशिष्ट सांस्कृतिक भूमिका घेत त्यांनी केले आहे. एक सच्चा कार्यकर्ता
लेखक म्हणून त्यांची ही भूमिका वेगवेगळ्या पातळ्यांवर समजून घेणे आवश्यक आहे. उत्तरायण
म्हणजे रूढ अर्थाने उत्तर दिशेकडे किंवा उजव्या विचारसरणीकडे जाणे नव्हे, तर खऱ्या
अर्थाने प्रश्नांच्या उत्तराकडे जाणे होय. उत्तरायण हा प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा
विचारप्रवर्तक प्रवास आहे.
- प्रा.
डॉ. वंदना महाजन