अण्णा भाऊ
साठे यांचे विचार व साहित्य : अलक्षित पैलूंचे आकलन । महादेव खुडे
पाने :
१४४ । किंमत : २००/-
जय भीम
लाल सलाम ! ही घोषणा आज देशातील सर्व परिवर्तनवाद्यांना आपलीशी वाटते. भारतातील जात
वास्तव व वर्ग वास्तव बदलण्याची नितांत गरज आहे, त्याशिवाय समान संधीसाठी, समतेसाठी
चालू असलेला लढा यशस्वी होणार नाही असा विचार या घोषणेमागे आहे. अत्यंत कमी शिक्षण
झालेले किंवा शालेय शिक्षणाची संधीच न मिळालेले; परंतु अत्यंत प्रतिभावान असलेले मानवतावादी
व मार्क्सवादी विचाराने प्रभावित झालेले व कृतिशील असलेले कॉम्रेड अण्णा भाऊ साठे हेच
खरे तर या घोषणेचे जनक होते व आहेत, असे वर्णन केल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
आपल्या
मृत्यूपर्यंत कम्युनिस्ट असलेले ' जग बदल घालुनी घाव , सांगुनी गेले मज भीमराव' असे
म्हणणारे अण्णा भाऊ, दुसरीकडे हे जग, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलिताच्या तळहातावर
उभी आहे.' असे वास्तववादी वर्णन करतात व जय भीम लाल सलाम ! या घोषणेच्या मूळ गाभ्यालाच
हात घालतात असे म्हणता येईल. 'दलित' या शब्दात जात व वर्ग यांच्या दुहेरी अत्याचाराने
पीडित असलेला श्रमिक अभिप्रेत आहे. त्यामुळेच दलित या शब्दाला अनेकांचा विरोध आहे व
असतो; परंतु कॉ. अण्णा भाऊंनी आपल्या कृतीने व विचाराने या वास्तवाचा पुरस्कार केला.
व जग बदलण्यासाठी योगदानही दिले. कॉ. महादेव खुडे हे कॉ. अण्णा भाऊंच्या कार्याने व
विचाराने प्रभावित झालेले मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत. त्यांनी जाणीवपूर्वक कॉ. अण्णा
भाऊ यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचे महत्त्व सांगणे,
त्यांच्या जीवनाविषयी व त्यांच्या साहित्याविषयी असलेले समज, गैरसमज व पूर्वग्रह दुरुस्त
करणे व त्याचबरोबर कॉ. अण्णा भाऊंच्या कार्याला व कर्तुत्वाला 'जातीच्या' संकुचित कोंदणात
बसविण्याच्या प्रयत्नांना सडेतोड उत्तर देणे, असा या पुस्तकाचा महत्त्वाचा विषय हाती
घेतला आहे.
- डॉ. कॉ.
भालचंद्र कानगो