हरवलेल्या कथेच्या शोधात । सीताराम सावंत
मुखपृष्ठ : सरदार जाधव
पाने :
१९२ । किंमत : २५०/-
संपर्क
: ८४५४०४९०३६ । ०२२-२४३७६०४२
जागतिकीतीकीकरणाच्या
या समकाळात मराठी साहित्यात आमूलाग्र बदल होत आहेत. विशेषतः कथा हा साहित्यप्रकार नवनवीन
शक्यतांनी विकसित होत आहे. मानवी जीवनाच्या समग्रतेला कवेत घेत मराठी कथा सशक्त होत
आहे. ग्रामीण, दलित, स्त्री तसेच महानगरीय अशा सर्वच स्तरातील जीवनावकाश समर्थपणे ती
आविष्कृत करते आहे. आविष्कारदृष्ट्या अनेकविध प्रयोग करत अधिक वाचनीय होत आहे. पारंपरिक
कथनशक्यता तिला गोष्टींच्या जवळ घेऊन जात आहेत. याच पार्श्र्वभूमीवर सीताराम सावंत
यांच्या 'हरवलेल्या कथेच्या शोधात' या संग्रहातील कथांचा विचार करावा लागतो. सावंत
यांची कथा ग्रामीण समाजवास्तवातून आकाराला येते. आपल्या आस्थेच्या परिघातून हरवत चाललेल्या
सामान्य खेडूत माणसांच्या जगण्याची परवड मांडणाऱ्या या कथा आहेत. गावखेड्यातील बदललेला
मूल्यसंघर्ष या कथेत केंद्रस्थानी राहतो. गावखेड्यातील भरभक्कम होणाऱ्या व्यवस्था आणि
हतबल, अस्थिर होणारा सामान्य माणूस यांचा तीव्रतर संघर्ष या कथेत प्रामुख्याने येतो.
झिरो वायरमन, तासिका तत्वावर काम करणारा शिक्षक, शेतीला जोड म्हणून इतर उद्योग करणारे
तरुण हे नव्या व्यवस्थेचे नवे शोषणकारी पाश ग्रामीण जीवनाला कसे वेटाळुन राहिले हे
या कथा सप्रमाण दाखवून देतात. बदलत्या काळाची दमनाची यंत्रणा आणि पिचलेपणाची शोकात्म
कहाणी सावंत आपल्या कथेतून उजागर करतातच; शिवाय स्त्री जगण्याचे बदलत गेलेले पाशही
नेमकेपणाने दाखवून देतात.
सहजसोप्या
पद्धतीने अवतारणारा हा कथनऐवज तशाच पद्धतीच्या संवादशैलीने तोलून धरला आहे. मौखिक गोष्टींच्या
कथनशक्यता हा सावंत यांच्या कथालेखनाचा महत्त्वाचा विशेष या संग्रहातील कथांमध्ये दिसतो.
- दत्ता
घोलप