आठ फोडा
आन बाहेर फेका । अमोल विनायकराव देशमुख
पाने :
११६ । किंमत : १५०/- । मुखपृष्ठ : सरदार जाधव
गावातल्या
भावकीतले मातब्बर पंच आणि त्यांची पंचायत जो निर्णय देते त्याने पुढच्या अनेक पिढ्यांची
सावलीही दूर लोटल्या जाते. 'आठ फोडा आन बाहेर फेका' हे जातपंचायतींमधून उच्चारले जाणारे
शब्द म्हणजे जणू जळता निखारा... निरपराध जिवांना बहिष्कृत करणारा... वाटा बंद करणारी,
माणसा-माणसात दुही माजवणारी आणि कोणाच्या तरी पदरी हिनत्त्व टाकून त्यांना वाळीत टाकणारी,
गाव सोडायला लावणारी ही जहरी मानसिकता एखाद्या धारदार काट्यासारखी या कवितेत सलत राहते.
'सगळीच पाखरं करत नाहीत हवापालटासाठी स्थलांतर, काहींच घरटं पेटवलं जातं.' या सारख्या
ओळींमधून ही सल व्यक्त होते. जोरदार पावसाच्या सलामीने एखादं नवं शक सुरू व्हावं, धारदार
मत्सरी काटे भिजून बोथट व्हावेत अशी आकांक्षा अमोल विनायकराव देशमुख हा कवी बाळगून
आहे.
या कवितेतली
कष्टणारी माणसं आपापल्या श्रद्धा जपणारी आहेत. कवी ज्याला 'मिक्स एरिया' म्हणतो त्या
गाव- मोहल्ल्यात राहणारी आणि परस्परांना जीव लावणारी आहेत. जिथं वारीची परंपरा जपली
जाते आणि उरुसही भरतो. संदल, मोहरमचे डोले निघतात आणि दिंडी- पालख्याही... हेव्यादाव्याचे
दप्तर घेऊन न वावरणारी निरागस मुलं या कवितेत आहेत. दिवसभर राबून रात्री अंगणातल्या
खाटेवर चांदण्याच्या सावलीत अंग टाकणारे अश्राप, रापलेले चेहरे आहेत. जिथे मस्जिदीच्या
घुमटावरची महाकारूणिक पाखरं मंदिराच्या कळसावरही हजर होतात. 'गंगा जमुनी तहजीब'चे हे
रूप कवीच्या गावात दिसते. मात्र अलीकडे या संबंधांची घट्ट वीण उसवण्याचे प्रयत्न करणारे
विद्वेषी राजकारण गावापर्यंत येऊन पोहोचले आहे. याकडे कवी लक्ष वेधतो.
ज्या माणसांची
दुनिया या कवितेत आली आहे त्याच माणसांच्या ओबडधोबड पण काळजातल्या बोलीतून ती व्यक्त
होते. या बोलीला दगड-धोंडयामधुन वाहणाऱ्या पाण्याचा नाद आणि तरतरीत रानाचा गंध आहे.
मराठी कवितेत स्वतःची ओळख निर्माण करण्याचे आश्वासन देणारी ही कविता आहे, तिला आणखी
नवनवे धुमारे फुटोत !
- आसाराम
लोमटे