दृश्यकला आणि साहित्य । वसंत आबाजी डहाके । दुसरी आवृत्ती
पाने : २०० । किंमत : ३००/-
साहित्याच्या भाषेशी म्हणजे प्रतिमा-प्रतीक-रूपक-मिथकयुक्त
भाषेशी दृश्यकलांच्या भाषेचा अनुबंध जोडता येतो. ती दृक् वाक्यांची भाषा असते. दृक्
वाक्ये म्हणजे लिहिलेली, कोरलेली, छापलेली वाक्ये नव्हेत. डोळ्यांनी पाहता येतात अशा
प्रतिमा येथे अभिप्रेत आहेत.
आपण दृक् वाक्ये वाचतो आणि कलाकृतीचा अर्थ आपल्या प्रत्ययाला
येतो. ते आपले दृश्य कलेतील एखाद्या कलाकृतीचे वाचन असते.
काव्याच्या, साहित्याच्या बाबतीत काव्यशास्त्र, साहित्यशास्त्र
हे शब्दप्रयोग केले जातात. तसेच चित्रकलेचे, छायाचित्रकलेचे, रंगभूमीचे, चित्रपटाचे
काव्यशास्त्र हा शब्दप्रयोग करता येतो. चित्र,छायाचित्र,रंगभूमी,चित्रपट या कलाक्षेत्रांतील
विचारव्यूहांचा, निर्मितीचा, प्रयोगांचा, बदलांचा संदर्भ साहित्याला आणि साहित्यविचाराला
नेहमीच असतो. त्याचप्रमाणे सर्वच ललितकलांचे वाचन, अर्थनिर्णयन, मूल्यमापन शक्य होईल
अशा विचारव्यूहाचा शोध सतत घेतला जात असतो.
प्रस्तुत ग्रंथातील विविध लेखांमधून वसंत आबाजी डहाके यांनी
कलाकृतींचा परामर्ष घेतलेला आहे आणि एकदंर कलांच्या काव्यशास्त्राचाही वेध घेतलेला
आहे.