आरपार झुंजार । एकनाथ
पाटील
पाने : १०४ । किंमत : १५०/-
मुखपृष्ठ : सरदार जाधव
चळवळींच्या रणभूमीवर भक्कमपणे पाय रोवून उभा असणारा लढवय्या योद्धा म्हणजे 'एन.डी.पाटील'. अविचल ध्येयनिष्ठा, नैतिकता आणि जिंकण्याचा ठाम निर्धार या बळावर सर्वसामान्य माणसांच्या हक्कांचे अनेक लढे त्यांनी प्राणपणाने लढविले. जिंकले. आयुष्यात अनेक चढ-उतार आणि ताणेबाणे अनुभवले. या सगळ्याचाच विलक्षण काव्यात्म अनुभव देणारी एकनाथ पाटील यांची 'आरपार झुंजार' ही दीर्घकविता आहे. अखंड संघर्षरत असणारा आणि तरीही अंतरी माणुसकीचा ओलावा जपत काळावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारा चळवळीतील नेता एका दीर्घकवितेचा विषय व्हावा, ही वाङ्मयाच्या क्षेत्रात अपवादाने घडणारी घटना आहे. कवीने कमालीच्या जिव्हाळ्याने एन. डी. पाटील यांचे जसे बाह्यदर्शन घडविले आहे, तितक्याच जिव्हाळ्याने त्यांची आंतरिक उलघालही समर्थपणे चित्रित केली आहे. या कवितेतून एन.डी.पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचे व्यापक दर्शन घडते. कळवळा, समंजसपणाचा स्पर्श आणि दूरदृष्टी या काव्यनायकाच्या प्रत्येक कृतिउक्तीत दिसते. कवीने कधी नायकाशी, तर कधी स्वतःशीच संवाद साधत त्यांचा हा संघर्षमय प्रवास विलक्षण गतिमानतेने आणि चित्रदर्शी पद्धतीने उभा केला आहे. संघर्षाला भिडू पाहणाऱ्या आणि त्याबद्दल मनस्वी आस्था असणाऱ्या प्रत्येकाला या कवितेतून काही जिवंत विचारसूत्रे, लढण्याची प्रेरणा आणि बांधिलकीचे बहुआयामी वस्तुपाठ मिळतील. एका रसरशीत, संघर्षमग्न व्यक्तित्वाला भेटल्याचा उमेद वाढवणारा अनुभव वाचकाला घेता येईल. सामाजिक चळवळींचा अवकाश संकुचित होत निघाल्याच्या आजच्या अस्वस्थ काळात संघर्षाचे जागते भान देणारी ही कविता म्हणूनच महत्त्वाची आहे.