हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा : दि मेकिंग ऑफ हिंदू इंडिया
। प्रमोद मुजुमदार
मुखपृष्ठ : मिलिंद कडणे
पाने : २३२ । किंमत : ३००/-
भारत एक हिंदूराष्ट्र आहे असे गृहीत धरून हिंदुत्ववादी प्रवाह
आपली सर्व राजकीय धोरणे आखत आहे. त्यासाठी एक व्यापक गुंतागुंतीची, विविध पातळीवर कार्यरत
असलेली हिंदुत्ववादी संघटनांची वीण निर्माण करण्यात आली आहे. त्यांचा प्रभावी वापर
करत एक समांतर राजकीय सत्ताकेंद्र उभे केले गेले आहे. मुस्लिम आणि अन्य अल्पसंख्यांवर ‘दुय्यम नागरिकत्व’
लादले जात आहे. देशाच्या मुलभूत संवैधानिक मूल्यांशी विपरित अशी ही वाटचाल आहे. या
सर्व धोरणांची पाळेमूळे हिंदुत्ववादी विचारप्रवाहाच्या गेल्या शंभर वर्षांच्या ऐतिहासिक
वाटचालीत पाहायला मिळतात.मात्र,या ‘बलशाली हिंदूराष्ट्र’ संकल्पनेची भुरळ आज देशातील
उच्च आणि मध्यम जातीवर्गातील तरुणांना पडली आहे.
हिंदुत्ववादी विचारप्रवाहावर बरेचदा ‘फॅसिस्ट’ किंवा ‘प्रतिगामी’
विचारसरणी अशी तुच्छता आणि हेटाळणीदर्शक शेरेबाजी केली जाते. पण सामान्य नागरिकांना
त्याचा फारसा उलगडाही होत नाही. उलट हिंदू धर्मात जन्माला आलेल्या माणसांना अशी टिकाटिप्पणी
म्हणजे समग्र हिंदू धर्मावरील टीका वाटते. असा सामान्य माणूस मग फारसा विचार न करता
हिंदुत्ववादी प्रवाहाकडे अधिकच ओढला जातो. म्हणूनच या हिंदुत्ववादी विचारप्रवाहाची
ऐतिहासिक वाटचाल नीट समजून घेणे अधिक महत्त्वाचे ठरते!