ढढ्ढाशास्त्री परान्ने
। मुकुंदराव गणपतराव पाटील
पाने : १२० । किंमत : १५० /-
मुकुंदराव पाटील यांनी ढढ्ढाशास्त्री परान्ने ही कादंबरी जेव्हा
क्रमशः प्रकाशित केली तेव्हा सत्यशोधकी राष्ट्रजाणीव आणि सत्यशोधकी राष्ट्रवाद स्पष्टपणे
प्रतिपादित झाला होता. त्याच पार्श्र्वभूमीवर ढढ्ढाशास्त्री परान्ने ही कादंबरी पहावी
लागते. ढढ्ढाशास्त्री परान्ने ही कादंबरी आकाराला येते ती प्रामुख्याने पुणे शहरात.
शंभर वर्षांपूर्वी स्वर्गात गेलेले ढढ्ढाशास्त्री यमदूतांनी दिलेल्या वचनामुळे शंभर
वर्षांनंतर पुन्हा एक वर्षासाठी आपल्या आवडत्या नगरीत येतात.
ढढ्ढाशास्त्रींना अपेक्षित असणाऱ्या मध्ययुगीन पुण्यातील जीवनाचा,
समाजाचा, शहराचा अनुभव त्यांना येत नाही. शंभर वर्षात बदललेले आधुनिक पुणे हे एका नव्याच
स्वरूपात त्यांच्यासमोर येते. आपले पारंपरिक पुणे आता नाही. लोक खूपच बदलले आहेत. ते
परत 'जुन्या जीवनशैली'प्रमाणे वागणार नाहीत. ढढ्ढाशास्त्रींची ही जुनी जीवनशैली धर्माधिष्ठित
होती. त्यातील दैनंदिन व्यवहार धर्म आणि जातीविषयक नियमांनी बद्ध होते; ते नियम आता
नाहीत आणि तशी जीवनशैली पुन्हा निर्माण होणार नाही हे समजल्याने हताश झालेले ढढ्ढाशास्त्री
पुन्हा स्वर्गात जातात.
विसाव्या शतकाच्या आरंभीची एक दुर्लक्षित पण महत्त्वाची मराठी
कादंबरी !