एक दोन
चार (अ) । राकेश वानखेडे
पाने
: ३०८ । किंमत : ४५०/-
मुखपृष्ठ
: मिलिंद कडणे
'आधी
माणूस, नंतर राष्ट्र' हे सूत्र उराशी बाळगून झपाटलेले चार तरुण 'एक दोन चार (अ)' या
कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेत पण ही कादंबरी त्यांच्या मागावर जात जात व्यवस्थेचीच
उलटतपासणी करू लागते. या सर्जन प्रवासात सर्व प्रकारचे बचावात्मक पवित्रे झुगारून राकेश
वानखेडे हे सध्याचा काळ उभा करतात. राजकारण, सत्ता, धर्म, जातव्यवस्था, इतिहास, संस्कृती
आदींची कठोर चिकित्सा करतात. व्यवस्थेतले हितसंबंध उघड करतात. हस्तक्षेपाच्या प्रयोजनापासून
ही कादंबरी जराही ढळत नाही. शोषितांच्या वाट्याला सामाजिक न्यायाचा उजेड येणे तर दूरच
पण त्यांच्यावर हेतुतः गुन्हेगारीचा शिक्का मारला जाऊ शकतो, कायद्याच्याच आधाराने त्यांना
देशद्रोही ठरवत आयुष्यातून उठवले जाऊ शकते, त्यासाठीच्या दृश्य-अदृश्य छळछावण्या समाजात
जागोजागी आहेत हे या कादंबरीत जोरकसपणे मांडलं गेलं आहे.
भांडवलदारी
व्यवस्था आणि धर्मांधतेचे ठेकेदार या दोन घटकांशी चाललेला कादंबरीतल्या तरुणांचा हा
संघर्ष अंतहीन आहे. या संघर्षासाठी जे उभे राहिले त्यांच्यातही दुफळी निर्माण होते.
त्यातल्या काहींना विद्रोह निरर्थक वाटतो आणि प्रस्थापित व्यवस्थेतच आपला अवकाश शोधावा
असे वाटू लागते तर त्यातलेच काही जण या संघर्षात प्राणांतिक किंमत चुकवतात. अशा स्थितीत
ही कादंबरी 'तुम्ही कोणाच्या बाजूचे आहात' या प्रश्नावर वाचकालाही मौन सोडायला लावते
आणि अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडते हे तिचे फार मोठे वैशिष्ट्य आहे आणि यशही...
- आसाराम लोमटे