बोऱ्याची गाठ । महेश मोरे
पाने : ३०० । किंमत : ४००/-
मुखपृष्ठ : मिलिंद कडणे
महेश मोरे यांची 'बोऱ्याची गाठ' ही कादंबरी अनेक दृष्टीने नवी
व महत्त्वाची आहे. सहकार ही खेड्याच्या उत्थानाची महत्त्वाची चळवळ होती. या चळवळीमुळे
खेड्यापाड्यात सहकारी संस्थांचे जाळे पसरले आणि शेतकऱ्यांच्या जीवनात नवे युग सुरु
झाले. अडते,नडते, दलाल,सावकार यांच्या मगरमिठीतून शेतकऱ्यांची सुटका झाली,पण हे वर्तमान
दीर्घकाळ टिकू शकले नाही.
सहकारी संस्थांत राक्षसी प्रवृत्ती घुसल्या व आख्खा सहकाराचा
धुळीला मिळाला आणि शेतकऱ्यांचे घर उघड्यावर पडले. जिल्हा बँका बंद पडण्याची महामारी
सुरु झाली. अशातच दुष्काळाचे महासंकट,शिकलेल्या मुलाच्या नशिबी आलेले वैराण वाळवंट,
यामुळे शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्यायच राहिला नाही. हे महाराष्ट्रातील प्रत्येक
खेड्याचे वर्तमान. खेडी अस्वस्थ झाली. पोटातील उलाढाल पचवता-पचवता मेटाकुटीला आली.
यात नव्याने शिक्षण घेणाऱ्या तरुणांची अवस्था बिकट आणि भयावह
झाली. अशा तरुणांचे अंतरंग आणि खेड्यातील सुरु झालेली मरणकाय संघर्षयात्रा 'बोऱ्याची
गाठ' या कादंबरीत आपणास वाचावयास मिळते. हे केवळ वर्तमानाचे चित्र नाही,तर भूगर्भात
होणाऱ्या उलाढालीचे आणि वाट सापडल्यानंतर होणाऱ्या उद्रेकाचे, लाव्हारसाचे यथार्थ दर्शन
आहे.
- राजन गवस