सूर्याचे सांगाती : बाबूराव बागुल यांच्या असंग्रहित कथा ।
संपादक : जी.के ऐनापुरे
पाने : १६८ । किंमत : २००
बाबूराव बागुलांची कथा व्यवस्थेने गांजविलेल्या शोषित वर्गाचे प्रतिनिधित्वकरणारी कथा आहे . दलित , ग्रामीण आणि महानगरीय परिप्रेक्ष्यात त्यांची कथा विस्तारत जाते . धर्माधिष्ठित आणि जातधिष्ठित व्यवस्थेने दलित , शोषित आणि स्त्रियांचे जगणे कसे नासवून टाकले याचे प्रत्ययकारी चित्रण त्यांच्या कथेतून दृग्गोचर होते . त्यापाठीमागे मार्क्सवादी आणि आंबेडकरी तत्त्वज्ञान आहे . त्यामुळे त्यांची कथा विध्वंसापेक्षा सर्जनतेच्या पातळीवर उत्कटतेने अवतरते . विचारांची मांडणी कथेत प्रविष्ट होत असली तरी त्यांची कथा प्रचारी आणि प्रसारी सूर आळविताना दिसत नाही . कलात्मकता आणि भावनात्मकता , आशयसूत्रे आणि अभिव्यक्तीचे तंत्र कथेची उंची वाढवितात व तिला जागतिक पातळीवर घेऊन जातात .जी .के . ऐनापुरे यांनी बाबूराव बागुलांच्या असंग्रहित कथांना ' सूर्याचे सांगाती'च्या रूपात वाचकांना बाबुरावांच्या कथेचे दालन उघडून दिले आहे . जी .कें.नी आपल्या दीर्घ प्रस्तावनेतून बाबूराव बागुलांच्या कथेची केवळ वैशिष्ट्ये सांगितले नसून त्यांनी बागुलांच्या कथेतून नवकथेची (प्रसंगी देशीवादाची ) बीजे कशी अवतरली आहेत , त्याचे विश्लेषण आणि संशोधन केले आहे . मार्क्सवादी तत्त्वज्ञान , आंबेडकरी तत्त्वज्ञान आणि हिंदू तत्त्वज्ञानाच्या एकसंघतेतून मानवी जीवनाचे अनेक पदर बागुलांनी कसे उलगडले आहेत , ते मंडित केले आहे . जी .के. ऐनापुरे यांनी असंग्रहित कथांचे संपादन करून त्यांच्या या कथा ' जेव्हा मी जात चोरली होती ' आणि ' मरण स्वस्त होत आहे ' या कथासंग्रहातील कथांप्रमाणेच समांतर जाणारी कथा आहे, असा निष्कर्ष काढला आहे .