काळवाटा । उत्तम बावस्कर
पाने : ११६ । किंमत : २००/-
मराठवाड्यातील छोट्या खेड्यात शेतकऱ्याच्या मुलाला शिक्षणासाठी
करावी लागणारी धडपड आणि त्याच्या समोर ठाकलेल्या समस्यांचा डोंगर वाचकाला विचारप्रवृत्त
करतो. स्वातंत्र्यानंतर खेड्यापाड्यात सर्वसामान्य गोरगरिबांचे नव्याने तयार झालेले
शोषक आणि त्यांचे निष्ठुर डावपेच जगू पाहणाऱ्या सामान्य माणसाच्या जगण्याचा चुराडा
कसे करतात, याचे हृदयस्पर्शी चित्रण उत्तम बावस्कर यांनी 'काळवाटा' या कादंबरीत केलेले
आहे. अस्मानी-सुलतानी संकटं झेलता झेलता जेरीस आलेल्या शेतकऱ्याच्या वाट्याला या काळाने
पेरलेले काच त्या घरातील नव्या शिकणाऱ्या पोराला गळफास कसे ठरतात हे वाचून कोणताही
वाचक अस्वस्थ व्हावा, हे या कादंबरीचे महत्त्वाचे यश आहे.
मराठवाड्यातील बोली आणि वर्णनातील चित्रमयता या कादंबरीला अधिक
गुणवत्ता प्राप्त करून देते. ही कादंबरी दुःखाच्या काळवाटेचा शोध घेता घेता शिक्षणाने
उजागर केलेल्या नव्या वाटांचा धीटपणे शोध घेते. या कादंबरीतील छोटी छोटी वाक्ये आणि
त्यांनी निर्माण केलेली लय वाचकाला घेरून टाकते. मराठी वाचक या कादंबरीचे भरघोस स्वागत
करतील, अशी आशा वाटते.
- राजन गवस