गोष्टी अशा विखरून पडतात
। सिद्राम पाटील । Goshti Asha Vikharun Padtat
। Sidram Patil
किंमत : २५० रुपये । पाने
: १७६
चिनुआ अचेबे यांच्या ‘थिंग्ज
फॉल अपार्ट’ या कादंबरीचं-‘गोष्टी अशा विखरून पडतात…’ हे मराठी भाषांतर प्रकाशित होत
आहे, ही मराठी भाषेसाठी आणि वाचकांसाठी अनेक अर्थानं चांगली घटना आहे.
१९५८ साली ही कादंबरी लिहिली
गेली तेव्हा चिनुआ अचेबे यांचं वय अठ्ठावीस वर्षं होतं. ही त्यांची पहिली कादंबरी.
ही आफ्रिकन-इंग्रजी साहित्यातली महत्त्वाची साहित्यकृती मानली जाते. या कादंबरीनं आफ्रिका
खंडाच्याच नव्हे, तर जागतिक साहित्याच्या इतिहासात ठळकपणे आपलं नाव कोरलं. आफ्रिका
खंडातल्या पन्नासहून अधिक देशांमधल्या लेखकांना आपापल्या भाषेतून आपल्या कहाण्या सांगण्यासाठीची
भाषा, रूप यांचं भान अचेबेनं दिलं. त्याच्या प्रयत्नानं आणि प्रोत्साहनानं कितीतरी
आफ्रिकन लेखकांचं साहित्य प्रकाशित झालं. जागतिक नकाशावर आफ्रिकन समाजाच्या परिस्थितीबाबत
त्यानं जी नोंद घ्यायला भाग पाडलं, त्यामुळे अचेबे हा आधुनिक आफ्रिकन-इंग्रजी साहित्याचा
जनक मानला जातो. लेखकसमुदायासाठी त्यानं वेगळ्या समाजांतल्या वेगळ्या वास्तवांसाठी
नवी भाषा आणि रूपं पुरवली असं एलेन शोवॉल्टर या विदुषीनं म्हटलेलं आहे. जगण्यातल्या
व्यामिश्रतेला सार्थ करू शकणारा नवा उच्चार जणू त्याला सापडला होता.
जगातल्या अनेक भाषांमध्ये
भाषांतरित झालेल्या ‘थिंग्ज फॉल अपार्ट’ या कादंबरीचा, टाईम्स मॅगझिननं १९२३ ते २००९
दरम्यानच्या काळातल्या निवडलेल्या १०० उत्कृष्ट कादंबऱ्यांमध्ये समावेश केलेला होता.
डब्ल्यू. बी. येट्सच्या ‘सेकंड कमिंग्ज’ या कवितेतली ओळ अचेबेनं या शीर्षकासाठी (थिंग्ज
फॉल अपार्ट) घेतलेली आहे. इथं ‘गोष्टी विखरून-विस्कटून पडतात’ या वाक्यांशाआधी ‘योग्य
संतुलनाअभावी’ हे दोन शब्द अनुस्युत आहेत.
दुरून, किंवा अंतरावरून
कुठेतरी होत असलेला विनाश आणि विध्वंस पाहून कळवळा व्यक्त करणं आणि इनसायडर म्हणून-त्या
संस्कृतीतले अंतःस्थ म्हणून, पोटतिडकीनं त्या विध्वंसातली वेदना मांडणं यात फरक असतो.
काळाच्या कोणत्याही तुकड्यात अशा घटना पुनरावृत्त झालेल्या दिसतात. पण अशा वेळी विवेकानं
त्याची चिकित्सा करणारी दृष्टीही समाजाला देण्याचं काम करणं हे त्या त्या काळातल्या
लेखकाचं कर्तव्य असतं. दुर्बळ माणसाच्या दर्शनबिंदूतून लेखकानं जगाकडे पाहाणं हे आवश्यक असतं अशी अचेबेची धारणा
होती. शोषकाच्या जागी स्वतःला कल्पिलं गेलं पाहिजे, त्याच्यात स्वतःला विरघळून टाकता
आलं तरच आपण त्याचा आवाज समजू शकतो आणि त्याचा आवाज बनण्याची क्षमता आपल्यात येऊ शकते
हे मानणारा आणि त्याप्रमाणे वागणारा हा महान लेखक होता.
अशा या महत्त्वाच्या आणि
श्रेष्ठ लेखकाची नावाजली गेलेली कादंबरी मराठीत
येणं हा चांगला योग आहे. सिद्राम पाटील यांनी या कादंबरीचं भाषांतर अतिशय कष्टपूर्वक
केलेलं असून ते अत्यंत वाचनीय झालेलं आहे याचा प्रत्यय वाचतांना येईल.
- गणेश विसपुते