अठराशे सत्तावन आणि मराठी
कादंबरी
लेखक : प्रमोद मुनघाटे
किंमत
३०० रु. / पाने २००
अठराशे सत्तावनची घटना ही भारतीयांच्या इतिहासात
स्वातंत्र्यसमर म्हणून नोंदली गेली
आहे, तथापि काही इतिहासकारांच्या मते ते
शिपायाचे बंड होते. डॉ. प्रमोद
मुनघाटे यांनी प्रस्तुत ग्रंथात या दोन्ही मतांची मांडणी केलेली असून त्याचा परामर्ष घेतलेला आहे. सत्तावनचा
उठाव अयशस्वी झाला. या पराभवाचे सुधारणावादींनी स्वागत केले. हे बंड अयशस्वी झाले ते
सामाजिक प्रगतीच्या दृष्टीने
योग्यच झाले, नाहीतर मध्ययुगीन सामंतशाही व्यवस्था
टिकून राहिली असती असे या सुधारणावादी लोकांचे मत
होते. याउलट राष्ट्रवादींचे, हा उठाव अयशस्वी झालेला असला तरी ते भारतीयांचे ब्रिटिश सत्तेच्या विरोधातील पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते असे मत
होते.
सुरुवातीच्या मराठी कादंबरीवर या दोन्ही मतांचा प्रभाव दिसून येतो.
१८५७ सालीच मराठीतली पहिली कादंबरी ‘यमुनापर्यटन’ प्रकाशित झाली होती. त्याचवर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापनाही झाली. त्यापूर्वी
महाराष्ट्रातील सुधारणावादींचे समाजप्रबोधनपर लेखन सुरू झालेले होते. या पार्श्वभूमीवर
सत्तावनच्या घटनेवर आधारित मराठी कादंबरीवर ऐतिहासिक
घटनेच्या प्रभावाऐवजी सामाजिक प्रबोधनाचा परिणाम अधिक झालेला दिसतो. डॉ. मुनघाटे यांनी
सत्तावनी मराठी कादंबरीची चिकित्सा सोदाहरण केलेली असून
तिच्यामागच्या प्रेरणांचा व प्रत्यक्ष आविष्काराचा वेध घेतलेला आहे. ब्रिटिशांची सत्ता असल्यामुळे
या कादंबरीकारांनी सत्तावनच्या बंडाचे, स्वातंत्र्यसमराचे
वास्तवनिष्ठ चित्रण केलेले नाही, उलट त्याविषयीची कादंबरीकारांची भूमिका प्रतिकूलच होती असे त्यांचे निरीक्षण आहे. त्याचवेळी
सामाजिक उत्थानाच्या संदर्भात ते अनुकूल होते. राष्ट्रवादी,
पुनरुज्जीवनवादी
कादंबरीकारांनी राष्ट्रगौरवाला महत्त्व दिले. या दोन्ही प्रेरणा कादंबरी लेखनात कशा
कार्यप्रवृत्त होत्या आणि त्यातूनच
ऐतिहासिक कादंबरी व सामाजिक कादंबरी हे दोन प्रवाह कसे निर्माण झाले, याविषयीचे या ग्रंथातले विवेचन
महत्त्वाचे आहे.
प्रस्तुत ग्रंथात भूमिका व उपसंहार यांसह ‘अठराशे सत्तावन
: बंड की स्वातंत्र्ययुद्ध’, ‘अठराशे सत्तावन : इतिहासाचा मागोवा’, अठराशे सत्तावन आणि साहित्य’, ‘सत्तावनी मराठी कादंबरी’ या चार प्रकरणांतून, भारतीयांच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या पर्वाचा साहित्याशी कोणता अनुबंध आहे,
हे उलगडून दाखवलेले आहे. राष्ट्राच्या जीवनात घडत असलेल्या राजकीय , सामाजिक , आर्थिक, धार्मिक घटनांचा साहित्याशी काही संबंध असतो की नाही, लेखकांचे त्याविषयीचे आकलन कसे असते आणि आविष्काराच्या संदर्भात कोणत्या मर्यादा पडतात हे
समजून घेण्याच्या दृष्टीने या ग्रंथाचे वाचन आवश्यक आहे .
- वसंत आबाजी डहाके