युगानुयुगे
तूच
कवी
: अजय कांडर
किंमत १२० रु.
'युगानुयुगे तूच' या अजय कांडर लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील दीर्घकवितेच्या सुरुवातीला असलेला कवीचा एकवचनी आत्मस्वर कवितेच्या शेवटी मात्र ‘समूहाने बोलू पाहतो' आणि दुःखाचे मळभ दूर होतील आणि नवी पालवी फुटणारच आहे, याची नि:संदिग्ध शब्दांत ग्वाही देतो. कवीची वैचारिक बांधिलकी आणि विश्वास अढळ असल्यामुळे ‘जीवन निरर्थक आहे', 'अनाकलनीय आहे', 'शून्यवत आहे', 'अराजकताच सार्वत्रिक आणि अंतिम सत्य आहे', असा हतबलतेचा भ्रमनिराशी सूर ही कविता काढत नाही. कवी ज्याप्रमाणे नैराश्याच्या डोंगराखाली स्वत:ला गाडून घेण्याचे नाकारतो, त्याचप्रमाणे आत्मप्रौढीचा राग आळवण्याचेही नाकारतो. त्याऐवजी, कविता कवितानायकाच्या विचारव्यवहारावर आणि त्या प्रभावातून निर्माण झालेल्या सामान्य जनतेच्या अपरंपार कर्तृत्वावर अढळ निष्ठा ठेवणारी होते. 'शेवटी मदांध तख्त' फोडण्याचा उग्र स्वर कवी काढत नसला तरी तोच आशय अलवारपणे पण थेटपणे मांडण्यात कवीला यश आलेले आहे. कवितेच्या शेवटी कवितेचा नायक आणि सामान्य श्रमजीवी जनता हे एकरूप होतात आणि नायकाचे एकवचनी असणेदेखील हे बहुवचनी सामुदायिकतेमध्ये रूपांतरित होते. हे ज्या कलात्मकतेने साधले गेले आहे ते मराठी कवितेच्या प्रांतात अद्वितीय ठरावे!
- दिलीप
चव्हाण, नांदेड