मार्क्स
आणि आंबेडकर संवाद चालू आहे । डी. राजा , एन.
मुथूमोहन
अनुवाद
: संगिता मालशे
पाने :
२२४ । किंमत : ३००/-
जे लोकशाही
आणि समाजवादासाठी संघर्ष करत आहेत असा दावा करतात, त्या कोणालाही जातीच्या प्रश्नाकडे
दुर्लक्ष करणे परवडणार नाही. जाती आणि जातीवादाविरोधात सातत्यपूर्ण, चिकाटीने, सैद्धांतिक,
राजकीय, सामाजिक – आर्थिक आणि व्यावहारिक अशा अनेक पातळ्यांवर संघर्ष करणे अनिवार्य
ठरते. जाती व्यवस्था कायम ठेवण्यात वर्चस्ववादी भूमिका निभावणाऱ्या विशेषत: जाती व्यवस्थेचा
पाया मजबूत आणि तिला कायम ठेवण्यासाठी हिंदू धर्माचे कोंदण देण्यामागील विचारधारेची
अत्यंत शास्त्रीय पद्धतीने चिकित्सा करणाऱ्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव
पहिले येते, असे अतिशय योग्य असे निरीक्षण लेखकांनी नोंदवले आहे. या जटील संबंधांमुळे
हे सर्व संघर्ष कडवट आणि चिकाटीचे बनतात. हा संघर्ष जरी ठेवतानाच त्याला सकारात्मक
कृतीची जोड देत, समाजात आजवर दबल्या गेलेल्या, शोषित, वंचित आणि मागास समजल्या गेलेल्या
जातींना बाकी समाजाच्या बरोबरीने आणावे लागेल. लोकांना एकत्र आणत असताना जाती व्यवस्थेचे
समूळ उच्चाटन करण्याच्या या संघर्षात विरोध विकासवादाचे सूत्र कायम प्रभाव टाकत राहते.
एकीकडे जाती व्यवस्था समाजात खोलवर रुजलेली आहे तर, दुसरीकडे जातीची उतरंड आणि अस्मिता
ही माणसांच्या एकूण मनात रुतून बसलेली आहे. याचा परिणाम म्हणून स्वाभाविकच जाती निर्मूलनासाठीचा
हा संघर्ष दीर्घकाळ चिवटपणे चालणार हे निश्चित !
मानवमुक्तीच्या संघर्षात कार्ल मार्क्स आणि डॉ. बी. आर. आंबेडकर
यांच्या महान भूमिकांविषयी लिहून काढण्याचे किचकट पण महत्त्वाचे काम दोन्ही लेखकांनी
लीलया पेलले आहे.
- कॉ. ए. बी. बर्धन