सोळा भाषणे । भालचंद्र नेमाडे । तिसरी आवृत्ती । ऑगस्ट २०२२
पाने : २३२ । किंमत : २५०/-
मराठी साहित्याच्या कक्षा रुंदावण्यासाठी आणि कस वाढविण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांनी आपला जीवनानुभव साहित्यात आणणं गरजेचे आहे, ह्या धारणेने प्रस्थापितांविरुद्ध उठाव केलेल्या साठोत्तरी चळवळीची गद्य बाजू भालचंद्र नेमाडे ह्यांनी समर्थपणे सांभाळली. लिहिण्याची परंपरा नसलेल्या वर्गातील लोकांना लिहिण्याची प्रेरणा देण्यासाठी केवळ तात्विक वा सैद्धांतिक मांडणी करून भागणार नाही, तर प्रत्यक्ष संवाद आणि संपर्काचीही नितांत गरज आहे, याचे त्यांना पुरेपूर भान होते. त्यामुळेच त्यांनी पाच सज्जड कादंबऱ्या लिहून, त्या जोडीनेच चर्चासत्रे, विविध माध्यमे ह्यांतून मुलाखती, भाषणे देणे हे कामही-वेळप्रसंगी स्वतःच्या सृजनाला मुरड घालून- अत्यंत निष्ठेने आणि अव्याहतपणे सुरूच ठेवले. ह्या संवादातून नेमाडेंनी मांडलेले विचार समाजशास्त्रीयदृष्ट्या देखील महत्त्वाचे आहेत. ह्या नव्वदोत्तरी सोळा भाषणांमधून, नेमाडेंचा व्यासंग, कळकळ, विचारांची चौफेर झेप, सडेतोड वृत्ती, भाषेवरची हुकमत ही वैशिष्ट्ये तर नेहमीप्रमाणे जाणवतातच, शिवाय साठोत्तरी चळवळीच्या वाटचालीत मराठी साहित्याचे जे काही भलेबुरे झाले त्याची झाडाझडतीही नेमाडे इथे घेताना दिसतात.
- सतीश तांबे