‘लोकवाङ्मय गृह’ ही प्रकाशन संस्था गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ मराठी साहित्य क्षेत्रात कार्यरत आहे. या काळात विविध विषयांवरील जवळपास पंधराशेहुन अधिक पुस्तके आम्ही प्रकाशित केली आहेत. आम्ही प्रकाशित केलेल्या पुस्तकांमध्ये विषयांचे वैविध्य आहे. त्यात कथा-कादंबऱ्या आहेत, तसेच समीक्षा ग्रंथही आहेत. इतिहास, तत्त्वज्ञान व राजकीय विचारधारेवरील अनेक पुस्तके आहेत. दैनंदिन व्यवहारात उपयोगी पडणारी पुस्तकेदेखील आम्ही प्रकाशित केली आहेत. कवितासंग्रहासारखा दुर्लक्षित व व्यावसायिकदृष्ट्या न परवडणारा साहित्यप्रकार टिकवून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने अनेक नव्या व चांगल्या कवींचे कवितासंग्रह आम्ही प्रकाशित केले आहेत. अनेक विषयावरील माहितीपर पुस्तिका प्रकाशित करणं हे लोकवाङ्मय गृहाचे वैशिष्ट्य आहे. भारतीय विवाह संस्थेचा इतिहास- वि. का. राजवाडे, वोल्गा ते गंगा – राहुल सांकृत्यायन, पुराणकथा आणि वास्तवता- दामोदर धर्मानंद कोसंबी यांसारखी मराठी पुस्तके सुरुवातीच्या काळात प्रकाशनगृहाची ओळख होती. अशा ह्या अभिजात पुस्तकांना आजही मोठ्या प्रमाणावर मागणी असते.
पदवीचे शिक्षण मराठीतून घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून देण्याची योजना, तसेच एकोणिसाव्या व विसाव्या शतकातील वैचारिक साहित्य नव्या पिढीला पुनर्मुद्रित स्वरूपात उपलब्ध करून देण्याची योजना यांद्वारे काही उत्तम पुस्तकांचे प्रकाशन आम्ही आजवर केले आहे व भविष्यातही आणखी काही पुस्तके या योजनांमध्ये प्रकाशित होणार आहेत. इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी यांच्या लेखनाचा मराठी अनुवाद हे आमचे संकल्पित प्रकाशन आहे. दहा निवडक लेखकांच्या साहित्याचे संपादित रूप ‘निवडक साहित्यमाला’ या मालिकेद्वारे दहा पुस्तकांचे प्रकाशन आम्ही केलेले आहे.
‘प्रगतिशील विचारांशी बांधिलकी’ हे आमचे व्रत आहे आणि ‘वाङ्मय’ हे ‘लोकवाङ्मय’ ठरावे, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे हे आमचे उद्दिष्ट आहे. ‘लोकवाङ्मय गृह’ हा एक साहित्यप्रेमी, पुस्तकप्रेमी लोकांचा मोठा परिवार आहे. यात आमचे लेखक, वाचक, पुस्तकविक्रेते यांच्याबरोबरच या ना त्या प्रकारे, निरपेक्ष भावनेने ‘लोकवाङ्मय गृहा’ला मदत करणाऱ्या अनेकांचा समावेश होतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मराठी चित्र चरित्र जे हिंदी, इंग्रजी शिवाय अन्य भारतीय भाषांत अनुवादित झाले आहे. परंतु अलीकडच्या काळातील प्रकाशनगृहाची ओळख म्हणजे कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ ह्या छोटेखानी पुस्तकामुळे दृढ झाली. या पुस्तिकेच्या ७५ हुन अधिक मराठी आवृत्या निघाल्या आणि अन्य भारतीय भाषांतही त्याचे अनुवाद होऊन लाखोंच्या संख्येने पुस्तकाची विक्री झाली.
साहित्य अकादमी, महाराष्ट्र फाउंडेशन, यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार, बाबा पद्मनजी साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शासन उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार, विशाखा काव्य पुरस्कार, यांसारखे विविध महत्त्वाचे पुरस्कार लोकवाङ्मय गृह प्रकाशित पुस्तकांना मिळालेले आहेत.
राज्य शासनाचा श्री. पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन संस्थेचा पुरस्काराची लोकवाङ्मय गृह प्रकाशनाला प्राप्त झालेला आहे.
No posts were found!
Sorry, but nothing matched your search terms. Please try again with some different keywords