विस्मरणापल्याड
: सतीश काळसेकर स्मृतिजागर
संपादक
: उदय नारकर । जयप्रकाश सावंत । मेघा पानसरे । नीतीन रिंढे
मुखपृष्ठ
: गणेश विसपुते
पुठ्ठाबांधणी
। पाने : २६४ । किंमत : ४५०/-
सतीश काळसेकरांसारखे
लोक ज्या स्तरातून आले आणि त्यांनी ज्या पद्धतीनं मोठं काम केलं, ते आपल्याला याच्या
आधीची कित्येक शतकं सापडणार नाही. खूप मोठं काम त्याचं झालं आहे. अतिशय मनमिळाऊ आणि
कायम लक्षात राहील असं ते व्यक्तिमत्त्व होतं.
... माझ्या
मते, राजा ढाले आणि सतीश काळसेकर या दोघांमध्ये त्या पिढीतल्या कुणाहीपेक्षा मोठ्या
प्रमाणावर नैतिकता होती.
- भालचंद्र
नेमाडे
आम्ही गयेमध्ये
शांतिस्तूप पाहायला गेलो. सतीश कुठे जागा मिळेल तिथे अंथरून टाकून झोपायचा, इतका तो
सामान्य माणूस होता. सतीशच्या सामान्य माणसाशी संबंध कसा होता ते पहा. 'सायकल-रिक्षावाले
कसं सातूचं पीठ खातात, ते खाऊन बघा' असं तो एकदा आम्हाला म्हणाला. आम्हाला सातूच्या
पिठाचे दोन घास गेले नाहीत. ... सतत बदलाचा ध्यास घेतलेला तो माणूस होता. 'आता पुरे'
असं जेव्हा त्याला वाटायचं तेव्हा अलिप्तपणे, कुठलाही गाजावाजा न करता तो स्वतःहून
बाजूला झालेला आहे.
- अर्जुन
डांगळे
सतीशचं
पेणचं घर फारच कमालीचं होतं. तो माणसांवरही प्रेम करायचा आणि माणसांना कपाटात बंदिस्त
करणं शक्य असतं, तर सतीशने आपल्या सगळ्यांना बंद करून ठेवलं असतं, अशी माझी खात्री
आहे.
- डॉ. भालचंद्र कानगो
सतीशमध्ये
मला मार्दव,मैत्र, वाचनाची प्रचंड असोशी आणि पुस्तकांवर व्यसनासारखं प्रेम दिसून येतं.
... आपला मित्र साधारणतः कोणत्या पद्धतीने विचार करणारा माणूस आहे, त्याच आवडतं काय
आहे, हे ध्यानात ठेवून अनेक वेळेला पुस्तकांची झेरॉक्स करून त्याने मला दिलेली आहेत.
अनेकदा 'पीपल्स बुक हाऊस' मध्ये तो माझ्यासाठी पुस्तकं बाजूला काढून ठेवायचा की, ही
तू वाचली पाहिजेस, घेतली पाहिजेस. हे इतकं असाधारण होतं.
- रंगनाथ
पठारे
सतीशला
मुळातच माणसांविषयी अतिशय प्रेम होतं. त्याच्या मित्रमंडळाची व्याप्ती फार मोठी होती.
जवळपास मुंबईच्या बाहेर, महाराष्ट्रात आपल्याला सगळीकडे असं दिसेल की सतीशचे चाहते
आहेत, मित्र आहेत. कुठलाही एखादा नवीन माणूस दिसला आणि त्याच्यामध्ये काही स्पार्क
आहे असं त्याला वाटलं तर सतीशने त्याला जवळ केलं, लिहितं केलं. ... सतीशचं नाव लघुनियतकालिकांशी
घट्टपणे जोडलेलं आहे. मुंबईच्या साहित्यिक पर्यावरणात लघुनियतकालिकांच्या संदर्भात
अशोक शहानेनंतर दुसऱ्या फळीत प्रामुख्याने नाव घेतलं जातं ते राजा ढाले आणि सतीशचं.
... सतीशच्या स्वभाव असा होता की कुणीही लघुनियतकालिक काढो, सतीश त्यांना सर्वतोपरी
मदत करायचा.
- चंद्रकान्त
पाटील
( या पुस्तकातून
घेतलेली किंचित संपादित अवतरणे )