माणूस असण्याच्या नोंदी । मेघराज मेश्राम
पाने : ७२ । किंमत : १५०/-
मुखपृष्ठ : राजू बाविस्कर
मेघराज मेश्राम यांची कविता कुठलाही अभिनिवेश नसलेला प्रामाणिक उद्गार आहे. झगमगत्या जगातील आपल्या
कळाहीन आयुष्याबाबत बोलताना ती नकळतपणे समाजाच्या
परीघाबाहेरील वर्गाचा विश्वसनीय आवाज होते. जगण्यातील भयाणपणामुळे येणारी, जीवनेच्छेच्या
मुळांना नख लावणारी, पराकोटीची अस्वस्थता त्यांच्या कवितेत जागोजागी दिसून येते.
मेघराजच्या कवितेत आपल्याला तिहेरी संवाद ऐकू येतो. पहिला स्वतःचा
स्वतःशीच चाललेला संवाद, ज्यात तो आपल्या अनुभवविश्वाच्या आधारे आपल्या अस्तित्वाची
पाळेमुळे शोधत जातो. हे करताना आपल्या व्यक्तिमत्वाचे आणि अंतर्विश्वाचे कंगोरे तर
तो तपासून बघतोच पण स्वतःतले सूक्ष्म गंडही प्रकटपणे मांडत जातो.
त्याच्या विश्वाच्या दुसऱ्या वर्तुळात माय, लेक, बाप, बायको
अशा निकटच्या व्यक्तींसोबतच्या गुंतागुंतीच्या घालमेलीतून तो आपल्या जगण्यातील संघर्ष
मांडत जातो.
त्याच्या आस्थेचा तिसरा संवाद हा स्व आणि कुटुंबाची वर्तुळे
ओलांडत अधिक व्यापक होत जातो. यात पशु-पक्षी, झाडे-झुडुपे, गाव-शहर, रस्ते-फुटपाथ येतात.
तुळसाबाई, चेन्दरू मडावी, आसिफा, शूर्पणखा, शंबूक अशा व्यक्तिरेखा येतात. गावातून शहराकडे
झालेले स्थलांतर आणि त्यातून येणारी हरवलेपणाची जाणीव येते. विषमतेने बाधित झालेली
रक्त शोषणारी व्यवस्था येते. सृजनाच्या नव्या अंकुराबद्दलची नवलाई येते. कवितेच्या
भक्कम आधाराने उजेडाची पेरणी करायची भाषा हा कवी वापरतो तेव्हा त्याचा भाषेबद्दलचा
आणि जगण्यावरचा गाढ विश्वासही दिसून येतो.
आत्मसन्मानाने जगता यावे याकरता संघर्ष करताना माणूसपणाचे भान
अवघ्या समष्टीला यावे ही तळमळ उराशी बाळगणारी ही कविता आहे. दु:खभावनेच्या मुळाशी जाऊन
तेथील ठसठस भाषेतून मांडणारी ही कविता आहे. आजच्या कवितेत नितळ व पारदर्शक भाषा सापडणे जिकीरीचे होऊन
बसले असताना मेघराज मेश्राम यांची कविता याही अंगाने आपल्याला आश्वासक दिलासा देत सामोरी
येते. तिचे स्वागत करायला हवे.
- प्रफुल्ल शिलेदार