सत्यशोधक वाङ्मयाचे प्रणेते : महात्मा जोतीराव फुले । विश्वनाथ
शिंदे
पाने : २७४ । किंमत : ३७५/-
समीक्षेच्या किंवा विचारांच्या क्षेत्रातील ग्रंथाची मौलिकता
कशी वाढते,हा वाङ्मयाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण प्रत्यही अनेक
ग्रंथ प्रकाशित होत असतात. परंतु त्यामध्ये नवीन काही सांगितलेले नसते. जी मते सांगितली
गेलेली आहेत किंवा जी मते लोकप्रिय झालेली आहेत, त्यांचेच तेथे प्रतिपादन करण्यात आलेले
असते. म्हणजे या लेखकांचे स्वतःचे असते काही म्हणणे आहे, असे त्यांच्या ग्रंथांमधून,
पुस्तकांमधून दिसत नाही. परिणामी, कधीकाळी सांगितली गेलेली मते अगर विचार बिनदिक्कतपणे
पुढे सरकत राहतात. असे लेखन करावयाचे म्हणजे संदर्भ देण्याची, संदर्भांचा अर्थ लावण्याची
गरजच उरत नाही. किंवा संदर्भ न देताच जुनीच मते कीर्तनकार शैलीत मांडणे सोपे असते.
अशा परिस्थितीमध्ये ज्याला मौलिक ग्रंथलेखन म्हणता येईल असे ग्रंथलेखन संख्येने अतिशय
कमी असणे स्वाभाविक आहे. अशा संख्येने कमी असणाऱ्या मौलिक ग्रंथांमध्ये डॉ. विश्वनाथ
शिंदे यांच्या 'सत्यशोधक वाङ्मयाचे प्रणेते : महात्मा जोतीराव फुले' या ग्रंथाचा समावेश
करावा लागेल. हा ग्रंथ म. जोतिबा फुले यांच्या समग्र व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा तर
आहेच,पण त्याबरोबरच एकोणिसाव्या शतकाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी साह्यभूत ठरणाराही आहे.