भणंग
प्रमोद
चोबीतकर
किंमत 350 रु. / पाने 296
प्रमोद बाबुराव चोबीतकर यांची ही कादंबरी विदर्भातील ग्रामीण जीवनाचे, तिथल्या माणसांचे, ग्रामीण संस्कृतीचे अस्सल दर्शन घडवते. विदर्भातील लहानशा गावात आपल्या नशिबी आलेले जीवन जिद्दीने जगणारी द्वारका कादंबरीच्या पहिल्या भागाच्या केंद्रस्थानी असली तरी तिचा सासरा केरबा आणि मुलगा शिर्पा यांच्यासह गावातली माणसे, गुरेढोरे, शेतजमिनी, कृषिजीवनाला व्यापून असणारे ऋतुचक्र, अज्ञान, दारिद्य्र, कष्ट, श्रद्धा, समजुती या साऱ्यांचे तपशिलवार, शेकडो बारकाव्यांनिशी चित्रण करताना लेखकाचे वर्ण्य विषयाशी असलेले तादात्म्य, ग्रामीण जीवनपद्धतीचे त्याचे सुक्ष्म निरीक्षण तर ध्यानात येतेच, पण त्याचबरोबर समाजजीवन, त्याला व्यापून असणारे राजकीय जीवन, त्यातले ताणतणाव वांचेही जिवंत भान लेखकाने सतत ठेवले असल्याचे जाणवते. ग्रामीण विदर्भातली संस्कृती, तसेच वैदर्भी भाषा, त्यातल्या म्हणी, वाक्प्रचार, शब्दांचे पोत हे सारे या कादंबरीच्या कानात रक्तप्रवाहासारखे वाहत आहे असे जाणवत राहते. या कादंबरीतली वऱ्हाडी भाषा सहज, अकृत्रिम आणि कमालीची अर्थवाही आहे.
कादंबरी ही
जीवनाप्रमाणेच प्रवाही, गूढ, अतर्क्य वळणे घेत असते, अनेक अंतर्गत व बाह्य घटक तिला आकार देत असतात, आणि तरीही ती जीवनाप्रमाणेच घाटाच्या बंदिस्त चौकटीत बसत
नाही;
जीवनाप्रमाणेच कादंबरीतली माणसे बदलतात, वाढतात, अकल्पित वाटांनी चालत
राहतात; जन्म, मृत्यू, नियती, योगायोग, संभाव्याचे आडाखे चुकवीत
काहीतरी भलतेच समोर येणे व त्यात वेढले जाणे
हे सारे कादंबरीत घडत असते हे ही कादंबरी वाचकाला दाखवीत
जाते.
- वसंत आबाजी डहाके